@notAuth('volunteer') @endnotAuth
Facebook Instagram X youtube
campaign-detail-bg
जिंजी
जिंजी
icon दिनांक१ मे २०२६
icon ठिकाण: जिंजी किल्ला, जि. विलुप्पुरम, तामिळनाडू

वर्णन

जिंजी किल्ल्याचा इतिहास

जिंजी किल्ल्याचे मूळ बांधकाम इ.स. १२०० मध्ये कोनार राजवंशातील अनंत कोन यांनी केले होते. त्या काळी त्याला कृष्णगिरी असे नाव देण्यात आले. पुढे विजयनगर साम्राज्याने किल्ल्याचे पुनर्निर्माण केले आणि १४व्या शतकात त्याची किल्लेबंदी अधिक मजबूत केली. १५६५ च्या तालीकोट युद्धानंतर विजयनगर साम्राज्य कमजोर झाले आणि जिंजीवर मराठा नायकांचा ताबा आला. त्यांनी किल्ल्याचा सुवर्णकाळ घडवला.

इ.स. १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला जिंकून दक्षिणी मोहिमांचे प्रमुख केंद्र बनवले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी येथे आश्रय घेतला. किल्ल्याच्या अभेद्यतेमुळे मुघलांना दीर्घ संघर्ष करावा लागला. औरंगजेबाने दीर्घकालीन वेढा घातला, परंतु राजाराम महाराजांनी तब्बल तीन वर्षे प्रतिकार केला. अखेरीस १६९८ मध्ये मुघलांनी किल्ला जिंकला, तरी राजाराम महाराज सुरक्षित निसटले. संताजी घोरपडे आणि बर्हिजी यांनी मुघल सैन्याला रोखून धरल्यामुळे राजाराम महाराजांना रायगड ते जिंजी प्रवास करता आला.

काही काळ राजा देसिंह (तेजसिंह) यांच्या ताब्यात राहिल्यानंतर इ.स. १७१४ मध्ये अर्काटच्या नवाबांनी हा किल्ला आपल्या अधीन केला आणि १७४९ पर्यंत तो त्यांच्या ताब्यात राहिला. पुढे १७५० ते १७७० या काळात किल्ला फ्रेंचांच्या ताब्यात होता. अखेरीस १७६१ मध्ये इंग्रजांनी किल्ला जिंकला. त्यानंतर त्याचे सैनिकी महत्त्व कमी झाले आणि तो ऐतिहासिक धरोहर म्हणून उरला.

मराठ्यांच्या इतिहासात रायगडला जितके महत्व आहे तितकेच महत्व जिंजी किल्ल्याला देखील आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने पकडून छळ करून मारण्यात आले. त्या कठीण काळात छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले आणि तिथून आठ वर्षे राज्यकारभार पाहिला. यामुळे औरंगजेबाला आपले निम्मे सैन्य दक्षिणेकडे पाठवावे लागले. परिणामी स्वराज्यावरचा दबाव कमी झाला आणि मराठ्यांनी पुन्हा गमावलेले किल्ले व प्रदेश जिंकून घेतले.

किल्ल्याची रचना 

जिंजी (सेनजी) किल्ला हा स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखला जातो. "दक्षिणेचा ट्रॉय" म्हणून प्रसिद्ध असलेला हा किल्ला भारतातील सर्वात अभेद्य आणि मजबूत किल्ल्यांपैकी एक मानला जातो.

हा दुर्ग तीन टेकड्यांवर बांधलेला आहे – राजगिरी, कृष्णगिरी आणि चकिलीदुर्ग (चंद्रगिरी). यांपैकी राजगिरी ही सर्वात उंच (सुमारे ८०० मीटर) असून तिच्या तीन बाजूंनी उंच, तुटलेले कडे आहेत आणि उत्तरेकडून एक अरुंद वाट वर जाते. किल्ल्याभोवती तिहेरी तटबंदी असून साधारणतः ११–१३ किलोमीटर लांबीची भिंत ११ चौ.किमी क्षेत्र व्यापते. या तटबंदीची रचना लष्करी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत कौशल्यपूर्ण आहे. टेहाळणी बुरुज, खंदक, राहण्याच्या जागा, पावसाच्या पाण्याचे तलाव व टाके यांचा संरक्षणासाठी केलेला वापर किल्ल्याला अधिकच अभेद्य बनवतो.

किल्ल्यात अनेक प्राचीन वास्तू व अवशेष आहेत. त्यात दोन देवळे, कल्याण महाल, दरबार हॉल, कोठारे, स्नानाचे चौरंग, कैद्यांची विहीर, घंटाघर, शस्त्रागार, हत्ती टाकी, अस्तबल, अन्न भंडार, व्यायामशाळा यांचा समावेश होतो. कल्याण महाल हे आठ मजली वास्तुशिल्पीय रत्न असून त्याचा उपयोग शाही स्त्रियांच्या निवासासाठी केला जात असे. वेंकटरमण स्वामी मंदिर हे खालच्या किल्ला परिसरात असून हिंदू महाकाव्यांवरील जटिल नक्षीकामाने सजलेले आहे. कृष्णगिरी दुर्ग इंडो-इस्लामिक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असून येथे घुमटाकार छत असलेला दर्शक हॉल आहे. तसेच सदातुल्ला मशिद धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक म्हणून उभी आहे.

जिंजी किल्ल्यात दोन परिष्कृत जलपुरवठा प्रणाली होत्या, ज्यामुळे किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणीही सतत पाणी उपलब्ध होत असे. दक्षिण भारतीय स्थापत्यकलेचा प्रभाव येथे स्पष्ट दिसतो – ग्रॅनाइट दगडांचा वापर, वळणदार चढाईचे मार्ग, जलनिकासीसाठी विशेष चॅनेल ही युद्धप्रतिरोधक तंत्रज्ञानाची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.

जिंजी किल्ला हा केवळ लष्करी सामर्थ्याचा पुरावा नाही, तर धार्मिक सहिष्णुता, सांस्कृतिक विविधता आणि स्थापत्यकलेचे अद्भुत प्रतीक म्हणून उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव असलेले १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांसह तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. जिंजी किल्ला हा मराठा सामर्थ्य, दूरदृष्टी आणि प्रतिकाराचे प्रतीक म्हणून इतिहासात अमर झाला आहे.

मोहिमेची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘आपला मावळा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तामिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ल्यावर स्वच्छता व संवर्धन मोहीम उत्साहात पार पाडली. या उपक्रमाने शिवकालीन वारसा जतन, पर्यावरण रक्षण आणि महाराष्ट्र–तामिळनाडू सांस्कृतिक ऐक्याचा प्रभावी संदेश दिला.

गडाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वयंसेवकांनी प्लास्टिक कचरा हटविणे, झाडाझुडपांची छाटणी करणे आणि ऐतिहासिक वास्तूंच्या परिसराची स्वच्छता करण्यावर विशेष भर दिला. गडाच्या मूळ रचनेला हानी पोहोचवणारे घटक दूर करून संवर्धनाचे कार्य करण्यात आले. स्वयंसेवकांनी गडावर भगवे झेंडे फडकावले आणि “जय भवानी – जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोहिमेला विशेष स्वरूप दिले. गडाच्या पायथ्याशी मल्लखांबाचे थरारक प्रात्यक्षिक, भरतनाट्यमचे सादरीकरण आणि शिवपोवाड्यांचा गजर झाला. महाराष्ट्र–तामिळनाडू सांस्कृतिक परंपरांचा संगम घडवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

डॉ. निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी गडसंवर्धनाची शपथ घेतली. “गड आपले आहेत, त्यांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे” असा संदेश देत वारसा जतनाची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली. स्वच्छता व संवर्धन मोहीमेला सांस्कृतिक व सामाजिक स्वरूप देण्यात आले, ज्यामुळे जनजागृतीचा प्रभाव अधिक वाढला.

शेवटी स्वयंसेवकांनी केलेल्या श्रमदानाचे दृश्य, स्वच्छ झालेला गडाचा परिसर आणि उत्साहाने भरलेले चेहरे मोहिमेच्या यशाची साक्ष देत होते. महाराष्ट्र दिनी आयोजित ही मोहीम वारसा जतन, पर्यावरण रक्षण आणि सांस्कृतिक एकात्मतेचा प्रभावी संदेश देणारी ही मोहीम भविष्यातील गडसंवर्धन उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरली. 

किल्ल्यांसाठी आवश्यक मागण्या व सुधारणा

१. वारसा जतन व जीर्णोद्धार

२. पर्यावरण संवर्धन

३. पर्यटक सुविधा

४. सुरक्षा व व्यवस्थापन

५. रोजगार व जनसहभाग

६. सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम

आपला प्रभाव

संख्या नाही, बदल मोजतोय!

३८८
स्वयंसेवक उपस्थित होते
एकूण लागवड संख्या
१०
एलईडी लाईट बसवण्यात आले
ट्री गार्ड बसवण्यात आले
५ तास
एकूण कालावधी
०.४० टन
कचरा उचलला
एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या
३ हेक्टर
एकूण स्वच्छ केलेला परिसर
एकूण फलक लावण्यात आले