@notAuth('volunteer') @endnotAuth
Facebook Instagram X youtube
campaign-detail-bg
लोहगड
लोहगड
icon दिनांक२९ मार्च २०२६
icon ठिकाण: लोहगड किल्ला, ता. मावळ, जि. पुणे

वर्णन

लोहगड किल्ल्याचा इतिहास

लोहगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगांतील एक अभेद्य व भव्य दुर्ग आहे. भाजे व बेडसे लेणी निर्माण होण्यापूर्वीच, म्हणजे इ.स.पू. दोन हजार वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजाम, मुघल आणि मराठा अशा अनेक राजवंशांनी वेगवेगळ्या कालखंडात या किल्ल्यावर ताबा मिळवला.

तेराव्या शतकापासून लोहगड किल्ल्याचा ठोस इतिहास दिसून येतो. इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना करून अनेक किल्ले जिंकले, त्यात लोहगडही होता. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम याला या किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले. पुढे इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला.

इ.स. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण–भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा परिसर स्वराज्यात सामील केला. मात्र १६६५ च्या पुरंदर तहानुसार किल्ला मुघलांना द्यावा लागला. १३ मे १६७० रोजी महाराजांनी पुन्हा किल्ला जिंकला. पहिल्या सुरत लुटीतील संपत्ती सरसेनापती नेताजी पालकर यांनी लोहगडावर सुरक्षित ठेवली होती.

इ.स. १७१३ मध्ये शाहू महाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला. १७२० मध्ये तो पेशव्यांच्या ताब्यात आला. नंतर नाना फडणवीसांनी किल्ल्याचे बांधकाम अधिक मजबूत केले. त्यांनी सोळा कान असलेली बाव बांधली व शिलालेख कोरला. नानांनी आपले द्रव्य लोहगडावर आणून ठेवले आणि धोंडोपंत नित्सुरे यांच्या देखरेखीखाली किल्ल्याचा कारभार चालवला.

इ.स. १८०३ मध्ये इंग्रजांनी किल्ला जिंकला, पण दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा ताब्यात घेतला. अखेरीस ४ मार्च १८१८ रोजी जनरल प्रॉथरने विसापूर जिंकून लोहगडावर हल्ला केला आणि मराठ्यांनी गड रिकामा केला.

किल्ल्याची रचना

लोहगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगांतील एक अभेद्य दुर्ग असून त्याचे सामरिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व विशेष आहे. समुद्रसपाटीपासून 3389 फुट उंचीवर वसलेला हा गड शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी आदर्श ठरतो. किल्ल्याची रचना भव्य असून त्यात दरवाजे, बुरुज, तळी, मंदिरे, इमारती आणि नैसर्गिक विंचूकडा यांचा समावेश आहे.

किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार गणेश दरवाजा असून त्यावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. पुढे नारायण दरवाजा आहे, जो नाना फडणवीसांनी बांधला होता. येथे भात व नाचणी साठवण्यासाठी भुयार आहे. हनुमान दरवाजा हा सर्वात जुना दरवाजा असून त्यावर प्राण्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. महादरवाजा हा सर्वात भव्य दरवाजा असून त्यावर हनुमानाची मूर्ती आहे. महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा दिसतो. दर्ग्याबाहेर चुना बनवण्याचा घाणा आहे, तर उजवीकडे ध्वजस्तंभ आणि त्याच्या जवळ तोफ बसवलेली आहे.

महादरवाज्याच्या पुढे लक्ष्मी कोठी आहे, जी राहण्यासाठी वापरली जात असे. तिच्या पुढे एक छोटेसे शिवमंदिर आहे. मंदिराजवळ अष्टकोनी तळे व पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. पुढे नाना फडणवीसांनी बांधलेले मोठे सोळाकोनी तळे आहे, ज्याच्या भिंतीवर मराठीत शिलालेख कोरलेला आहे.

किल्ल्याचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे विंचूकाटा. हा भाग पंधराशे मीटर लांब व तीस मीटर रुंद असून विंचवाच्या नांगीसारखा दिसतो. विंचूकाट्यावरून गडाच्या आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसतो. किल्ल्यावर शंभर लोक राहू शकतील एवढी मोठी गुहा आहे. उत्तरेकडील टोक निमुळते होत गेले आहे आणि विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे.

लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. ही सर्पाकार वाट अशी रचलेली आहे की वर चढणारा माणूस पहारेकऱ्यांच्या नजरेआड जात नाही. वाटेवर वेगवेगळे बुरुज आहेत, ज्यावरून बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवता येते. या वाटेवर गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा असे चार दरवाजे आहेत.

किल्ल्याच्या माथ्यावरून विस्तीर्ण सह्याद्री पर्वतरांगा आणि पवना धरणाचे मनमोहक दृश्य दिसते. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, गडाच्या वाटेवर वाहणाऱ्या झऱ्यांचा मंजुळ आवाज आणि थंड वार्‍याची साथ या साऱ्या गोष्टी ट्रेकिंगला आणखी रोमांचक बनवतात. या मार्गावर प्राचीन भाजे लेणीही लागतात, ज्यामुळे ट्रेकिंगसोबतच संस्कृतीचा एक अनमोल ठेवा अनुभवता येतो.

मोहिमेची वैशिष्ट्ये

लोहगड किल्ल्यावर आपला मावळा संस्थेच्या पुढाकाराने राबविण्यात आलेली स्वच्छता व संवर्धन मोहीम ही इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरण यांचा संगम ठरली. युनेस्कोच्या "Maratha Military Landscapes of India" वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील या अभेद्य दुर्गावर खासदार डॉ. निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मावळ्यांनी सकाळपासूनच “जय भवानी – जय शिवाजी” च्या घोषणांनी वातावरण भारावून टाकत श्रमदानास प्रारंभ केला.

स्वयंसेवकांनी गडावरील कचरा, प्लॅस्टिक, बाटल्या व अनावश्यक झुडपे हटवून परिसर स्वच्छ केला. पर्यटकांसाठी मार्गदर्शक फलक बसवले, बसण्यासाठी बाकडे उभारले आणि कचरा कुंड्यांची व्यवस्था केली. किल्ल्यावरील सर्व दरवाजे, मंदिर, पाण्याचे टाके परिसरात स्वच्छता करण्यात आली.  या उपक्रमात माजी मंत्री जयंत पाटील यांनीही मावळ्यांसोबत श्रमदान करून सहभाग दिला. लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, स्थानिक युवक, शिवप्रेमी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोहिमेला अधिक बळ दिले.

महत्वाच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक, सूचना फलक, बाकडे व कचरा कुंड्या बसविण्यात आल्याने पर्यटकांना सुविधा उपलब्ध झाल्या. या उपक्रमामुळे लोहगड किल्ल्याला नवसंजीवनी मिळाली असून त्याच्या सामरिक व सांस्कृतिक महत्त्वाला अधोरेखित करणारा हा प्रयत्न भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

किल्ल्यांसाठी आवश्यक मागण्या व सुधारणा

१. ऐतिहासिक जतन

२. पर्यटक सुविधा

३. स्वच्छता व पर्यावरण संरक्षण

४. सुरक्षा व व्यवस्थापन

आपला प्रभाव

संख्या नाही, बदल मोजतोय!

३२६
स्वयंसेवक उपस्थित होते
एकूण लागवड संख्या
१०
एलईडी लाईट बसवण्यात आले
ट्री गार्ड बसवण्यात आले
५ तास
एकूण कालावधी
०.४० टन
कचरा उचलला
एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या
४ हेक्टर
एकूण स्वच्छ केलेला परिसर
१५
एकूण फलक लावण्यात आले