आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
इ.स. सहाव्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहन, चालुक्य, यादव, बहमनी, निजामशाही व मोगल अशा अनेक राजवटींनी या किल्ल्यावर आपले वर्चस्व गाजवले. मात्र, भोसले घराण्याच्या काळात शिवनेरी किल्ल्याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच शिवनेरी किल्ल्यावर झाला. या किल्ल्याच्या साक्षीने त्यांचे बालपण घडले. बालवयातच त्यांनी राज्यकारभार, युद्धकला आणि मुत्सद्देगिरीचे धडे येथेच गिरवले.
शिवनेरी किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून महाराष्ट्राच्या अभिमान, शौर्य आणि परंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळे तो इतिहासप्रेमी, विद्यार्थी व पर्यटकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
शिवनेरी किल्ल्याची रचना ही लष्करी कौशल्य, अभेद्य संरक्षण आणि आत्मनिर्भरतेचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. जुन्नरच्या डोंगरमाथ्यावर उभारलेला हा त्रिकोणी गड तिन्ही बाजूंनी उंच कड्यांनी वेढलेला असल्यामुळे शत्रूंना आत प्रवेश करणे अत्यंत कठीण होते.
गडाच्या मार्गात शिवाई देवीचे मंदिर, जिजामाता व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा, प्राचीन जलकुंड आणि सात दरवाजे पाहायला मिळतात. शिवाई देवीच्या मंदिरामुळे या किल्ल्याला ‘शिवनेरी’ हे नाव मिळाले. असे मानले जाते की देवी शिवाईने बाल शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या भवितव्याला दिशा दिली.
गडावरील प्रत्येक दरवाजा मजबूत बांधणीचा आहे. हे दरवाजे एकामागून एक अशा पद्धतीने बांधलेले असल्यामुळे शत्रूला आत शिरताना प्रत्येक टप्प्यावर अडथळा निर्माण होतो. तटबंदी सात स्तरांमध्ये विभागलेली असून ती दीर्घकाळ वेढ्याला तोंड देण्यास सक्षम होती. किल्ल्याच्या बुरुजांवरून शत्रूंच्या हालचालींवर सहज नजर ठेवता येत असे. गडाची जलव्यवस्था ही त्याच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. बदामी तलाव आणि गंगा-जमुना झरे सतत पाणीपुरवठा करत, त्यामुळे रहिवाशांना पाण्याची कमतरता जाणवत नसे.
लपवलेल्या वाटा, गडद मार्ग आणि भक्कम तटबंदी यामुळे हा गड अभेद्य ठरला. दीर्घकालीन वेढ्यांना तोंड देण्यासाठी आणि रहिवाशांचे संरक्षण करण्यासाठी ही रचना विशेषतः तयार करण्यात आली होती. म्हणूनच शिवनेरीची रचना ही केवळ संरक्षणासाठी नव्हे, तर दीर्घकाळ टिकणाऱ्या लढाईसाठी सक्षम अशी होती.
शिवजन्मस्थळ आजही इतिहासप्रेमींना आकर्षित करते. दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी येथे मोठा सांस्कृतिक उत्सव साजरा होतो. पारंपरिक संगीत, ऐतिहासिक देखावे आणि नाट्यप्रयोग यामुळे हा दिवस अविस्मरणीय ठरतो.
किल्ल्यावरच्या काही विशिष्ट ठिकाणांवरून जुन्नर परिसराचे सुरेख दृश्य दिसते, जे पर्यटकांना मोहून टाकते. त्यामुळे शिवनेरी हा केवळ एक ऐतिहासिक गड नसून, तो सांस्कृतिक वारशाचे आणि जनमानसातील श्रद्धेचे केंद्रस्थान ठरतो.
शिवनेरी किल्ल्यावर आयोजित केलेली स्वच्छता व संवर्धन मोहीम ही इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरण यांचा संगम ठरली. गड परिसरातील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, झाडाझुडपांची छाटणी, पायऱ्यांची स्वच्छता आणि कीटक व बुरशीपासून संरक्षण होण्यासाठी झाडांच्या खोडांना रंग देणे अशा उपक्रमांमुळे किल्ल्याचे सौंदर्य अधिक खुलविण्यात आले.
मोहीमेच्या दरम्यान मधमाशांच्या अचानक हल्ल्यामुळे काही काळ कामात खंड पडला, तरीही मोचक्याच स्वयंसेवकांनी शिवाई देवीचे मंदिर, जिजामाता व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा तसेच शिवजन्मस्थळ स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर दिला. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
गडाच्या ऐतिहासिक महत्त्वाची माहिती देणारे सूचना फलक बसविण्यात आले तसेच पर्यटकांसाठी बसण्याची सोय म्हणून बाकडे उभारण्यात आले. कचरा संकलनासाठी डस्टबीनचे वितरण करून स्वच्छतेची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यात आली.
या मोहिमेत स्थानिक शिवप्रेमी, युवक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी केला. परिणामी शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव जपले गेले आणि पर्यावरण रक्षणासोबतच सांस्कृतिक वारशाचे संवर्धन साध्य झाले.
१. ऐतिहासिक जतन व जीर्णोद्धार
२. सांस्कृतिक व माहितीपर सुविधा
३. पर्यावरण संवर्धन
४. सुरक्षा व आपत्कालीन सुविधा
५. रोजगार व व्यवस्थापन
संख्या नाही, बदल मोजतोय!