@notAuth('volunteer') @endnotAuth
Facebook Instagram X youtube
campaign-detail-bg
तुळापुर
तुळापुर
icon दिनांक२१ जून २०२६
icon ठिकाण: तुळापुर, ता. हवेली, जि. पुणे

वर्णन

तुळापुर चा इतिहास

तुळापुरचे मूळ नाव नागरगाव होते. इ.स. १६३३ मध्ये शहाजी महाराजांनी येथे हत्तीच्या पिल्लाची तुला केली आणि त्या प्रसंगानंतर या स्थळाला तुळापुर असे नाव मिळाले. त्या वेळी रुद्रनाथ महाराजांच्या आदेशानुसार शहाजी महाराज व आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांनी संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.

संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला; तर ११ मार्च १६८९ रोजी तुळापुरात त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील अखेरचे दिवस तुळापुरात गेले. 

संभाजी महाराजांना फेब्रुवारी १६८९ मध्ये संगमेश्वर येथे मुकर्रब खानाने पकडून येथे कैद केले होते. त्यानंतर बहादूरगड येथे ठेवून तुळापुरात आणले गेले. येथे चाळीस दिवस प्रचंड छळ करून निघृण हत्या केली. फाल्गुन वद्य ३०, शके १६३० (दि. ११ मार्च १६८९) रोजी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीराचे तुकडे नदीपलीकडे फेकले. वढू गावातील लोकांनी उरलेले अवयव एकत्र शिवून अंत्यसंस्कार केले. या कार्यामुळे त्या लोकांचे आडनाव शिवले पडले, जे आजही गावात मोठ्या प्रमाणावर आढळते.

भीमा नदीपलीकडील वढू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. संभाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याखाली त्यांचा अस्थिकलश शाहू महाराजांनी तांब्याच्या कलशात जतन करून ठेवला आहे, याची नोंद ताम्रपटावर आहे.

अशा प्रकारे पुरंदरच्या शिखरावर जन्मलेला हा पराक्रमी राजकार्य धुरंधर हिंदवी स्वराज्याचा स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी तुळापुरच्या पंचगंगेच्या संगमावर चिरनिद्रिस्त झाले. 

तुळापुरची रचना 

तुळापुरची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. भीमा व इंद्रायणी नदीच्या संगमावर वसलेले हे क्षेत्र पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. तुळापुर व वढू बुद्रुक ही गावे नदीच्या दोन काठांवर असून दोन्ही ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. तुळापुरातील समाधीस्थळी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे, तर शेजारी कवी कलश यांचे बलिदान स्थळ आहे.

या क्षेत्रात स्वयंभू पाच महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत, ज्यामुळे या स्थळाला गया व प्रयाग यांच्या बरोबरीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता जिजाऊ यांच्या हस्ते झाला होता. हे मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर दरवाज्यातून थेट भिमानदीच्या घाटावर जाता येते. मंदिराच्या आवारात भव्य दगडी दीपमाळ, नंदी, गणेश, विठ्ठल–रूख्मिणी, हनुमान मंदिर व शिवपिंड यांचे दर्शन होते. खांबांवरील नक्षीकाम विशेष आकर्षक आहे.

इंद्रायणी, भामा व भीमा या तीन नद्यांचा संगम येथे आहे. संगमाच्या घाटावर महाबल्लाळेश्वर, रामेश्वर, कोटेश्वर अशी मंदिरे आहेत. भीमा नदीच्या उजव्या तीरावर श्री विष्णु महाबळेश्वर, श्री काशी विश्वनाथ, शिवकालीन गणेश मंदिर व इतर महादेव मंदिरे आहेत. त्रिवेणी संगमावर स्नानासाठी प्राचीन घाट आहेत, तसेच जलविहारासाठी नौका सुविधा उपलब्ध आहे. 

संभाजी महाराजांच्या समाधी प्रवेशद्वाराच्या कमानीवर त्यांचे शौर्य दर्शविणारे शिल्प आहे, ज्यात महाराज सिंहाचा जबडा फाडताना दाखविले आहेत. आत गेल्यावर किल्ल्यासारखी दगडी तटबंदी व बुरुजांसहित कुंपण दिसते, ज्यामध्ये महाराजांचा पुतळा उभारलेला आहे.

इतिहासाच्या स्मृतींनी भारलेले हे स्थळ नयनरम्य निसर्गाने सजलेले आहे. त्यामुळे पर्यटक येथे येऊन संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास जाणून घेतात आणि त्रिवेणी संगमासमोर बसून त्या प्रसंगाची आठवण करून मनोमन थक्क होतात.   


 मोहिमेची वैशिष्ट्ये

‘आपला मावळा’ची १५ वी मोहीम वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे उत्साहात पार पडली. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानभूमीचा इतिहास जतन, स्वच्छता, संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत ही मोहीम खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

२० जूनच्या रात्री राज्यभरातून आलेले शेकडो मावळे वढू बुद्रुक येथे दाखल झाले. पहाटे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नित्यपूजा, अभिषेक आणि मानवंदना देऊन मोहिमेची सुरुवात झाली. पोवाड्यांचे सूर, शिवगर्जना आणि “जय शिवराय”, “जय शंभूराजे”च्या घोषणांनी परिसर भारावून गेला. राजमाता जिजाऊ वंदना झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

टिकाव, खोरे, झाडू, सूचना फलक, ट्री गार्ड यांचे वाटप करून वृक्षारोपण, परिसर स्वच्छता आणि सोलर लाईट्सची उभारणी करण्यात आली. खासदार निलेश लंके यांनी स्वतः श्रमदान करून मावळ्यांसोबत वृक्षारोपण केले. वाघोली येथील शौर्य अकॅडमीचे विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

वढू बुद्रुक येथील काम पूर्ण झाल्यानंतर सर्व मावळे तुळापूरकडे प्रस्थान केले. स्थानिक नागरिकांनी उत्साहात स्वागत करून मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. येथेही वृक्षारोपण, ट्री गार्ड बसविणे, सूचना फलक व सोलर लाईट्सची उभारणी करण्यात आली. संगमेश्वर मंदिर व परिसराची स्वच्छता, त्रिवेणी संगम परिसरात वृक्षारोपण आणि नदीकिनाऱ्याची स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

मुस्लिम मावळे पैगंबर शेख यांनी इतिहास, सामाजिक एकात्मता आणि शिवचरित्रातील प्रेरणादायी पैलूंवर मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी भोजनाची व्यवस्था करून सहकार्य केले.

अशा प्रकारे इतिहास, स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि समाजजागृतीचा संदेश देणारी ‘आपला मावळा’ची १५ वी मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली.

 तुळापुर साठी आवश्यक मागण्या व सुधारणा

राज्य सरकारने ₹५३२.५१ कोटींचा सुधारित आराखडा मंजूर केला असून यात भीमा नदीवरील पूल, रस्त्यांचे रुंदीकरण, ‘हेरिटेज वॉक’ कॉरिडॉर, संग्रहालय, १०D शो ऑडिटोरियम, ग्रंथालय, स्मृतिचिन्ह दुकाने, घाट, पार्किंग व सोलर लाइट्स यांचा समावेश आहे. कामे टप्प्याटप्प्याने सुरू असून काहींची अंमलबजावणी प्रक्रियेत आहे.

आवश्यक सुधारणा व मागण्या

 

आपला प्रभाव

संख्या नाही, बदल मोजतोय!

३२१
स्वयंसेवक उपस्थित होते
३०
एकूण लागवड संख्या
एलईडी लाईट बसवण्यात आले
ट्री गार्ड बसवण्यात आले
५ तास
एकूण कालावधी
१.०० टन
कचरा उचलला
एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या
२ हेक्टर
एकूण स्वच्छ केलेला परिसर
एकूण फलक लावण्यात आले