आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
रामशेज किल्ल्याचा इतिहास हा पौराणिक श्रद्धा, मराठ्यांच्या अदम्य शौर्य आणि सामरिक कौशल्याचा संगम आहे. श्रद्धेनुसार प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात या डोंगरावर विश्रांतीसाठी थांबले होते. त्यावरूनच "रामाची शेज" या संकल्पनेतून ‘रामशेज’ हे नाव पडले.
इतिहासाच्या दृष्टीने हा किल्ला मराठा-मुघल संघर्षातील अद्वितीय शौर्यगाथेसाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब दक्षिणेत उतरला व महाराष्ट्र जिंकण्याचा चंग बांधला. दीड लाख फौजेसह स्वराज्यावर चालून आला. मात्र छत्रपती संभाजी महाराज सह्याद्रीच्या अभेद्य भिंतीसारखे स्वराज्याचे रक्षण करण्यास सज्ज होते.
इ.स. १६८२ मध्ये औरंगजेबाने शहाबुद्दीनला ४० हजार फौजेसह पाठवले, परंतु फक्त ५००–६०० मावळ्यांनी तब्बल सहा वर्षे मुघल सैन्याला झुंज दिली. मराठ्यांनी लाकडी तोफा तयार करून शत्रूला भ्रमित केले, गनिमी कावा, रात्रीचे छापे, दगड व गवताच्या गंजी यांचा वापर करून मोगल छावणीला जेरीस आणले. औरंगजेबाला किल्ला जिंकण्यासाठी शहाबुद्दीन खान, खानजहान बहादूर कोकताश आणि इखलास खान सारखे तीन सरदार बदलावे लागले, तरीही किल्ला मराठ्यांच्या ताब्यातच राहिला.
मोगल सरदारांना पराभूत करताना मराठ्यांनी आपल्या युक्ती आणि शौर्याचा परिचय दिला. लाकडी तोफा, पेटते कपडे, निवडक सैनिकांचा दबा यांसारख्या सामरिक युक्त्यांनी मराठ्यांनी मोगलांचे प्रयत्न होणून पाडले.
रामशेज किल्ल्याची ही लढाई मराठ्यांच्या अदम्य जिद्दीचे, शौर्याचे आणि सामरिक कौशल्याचे प्रतीक ठरली. हा किल्ला आजही मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा जिवंत पुरावा म्हणून उभा आहे.
रामशेज किल्ल्याची रचना ही गिरिदुर्ग प्रकारातील असून त्यात नैसर्गिक संरक्षण आणि कलात्मक बांधणी यांचा संगम दिसतो. गड सुमारे ३२०० फूट उंचीवर असून किल्ल्याभोवती मजबूत तटबंदी, खंदक आणि नैसर्गिक कडे असल्यामुळे शत्रूला सरळ प्रवेश करणे कठीण होते.
गडावर प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सीता गुंफा, राम मंदिर, देवीचे मंदिर आणि गणपती मूर्ती यांसारखी धार्मिक स्थळे दिसतात. शिलालेख, कोरीव पायऱ्या आणि चुण्याचा घाणा हे शिवकालीन वास्तुशिल्पाचे पुरावे आहेत. गडावर पाण्याच्या टाक्यांचे समूह असून ते आजही पाणी साठवतात. चोर दरवाजा हा गुप्त मार्ग म्हणून वापरला जात असे.
रामशेज किल्ल्याच्या पठारावरून देहेरगड, भोरगड आणि त्र्यंबकगड यांचे दर्शन होते. या रचनेतून दिसते की किल्ला केवळ युद्धासाठीच नव्हे तर धार्मिक श्रद्धा, पाणीपुरवठा आणि सुरक्षितता यांचा विचार करून बांधला गेला होता.
थोडक्यात सांगायचे तर, रामशेज किल्ल्याची रचना ही धार्मिक स्थळे, सामरिक संरक्षण आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा त्रिवेणी संगम आहे, ज्यामुळे तो आजही मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा आणि शिवसंस्कृतीचा जिवंत पुरावा ठरतो.
रामशेज किल्ल्यावर ‘आपला मावळा’ संस्थेने राबवलेली स्वच्छता मोहीम ही इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरण यांचा संगम ठरली. या उपक्रमात हजारो शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नाशिक येथील अकॅडमीच्या युवक-युवतींनीही सक्रिय योगदान देत गडावरील स्वच्छता, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी ट्री-गार्ड बसविण्याचे काम केले.
पर्यटकांसाठी स्वागत कमानी, सूचना फलक, डस्टबिन्स, सोलर दिवे आणि बाकडे यांसारख्या सुविधा उभारून गडाला आधुनिक सोयीसुविधांचा नवा चेहरा मिळाला. गडाच्या वाटेवर आलेले मोठे दगड बाजूला करून मार्ग सुकर करण्यात आला, तसेच वाटेत वृक्ष लागवड करत करत मोहीम गडाच्या दिशेने पुढे सरकत होती.
प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करून गडाला प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवला गेला. शिवप्रतिज्ञा आणि जिजाऊ वंदनेच्या सादरीकरणाने सहभागींच्या मनात स्वराज्याच्या तेजस्वी वारशाची आठवण जागवली.
या मोहिमेला खासदार श्री. भास्कर भगरे आणि श्री. राजाभाऊ वाजे यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपक्रमाला अधिक बळ मिळाले आणि सहभागींच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला.
‘आपला मावळा’ संस्थेची ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित न राहता, ती सांस्कृतिक जागृती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकतेचा दीपस्तंभ ठरली. रामशेज किल्ल्याच्या शौर्यगाथेला आधुनिक काळात जपण्याचा आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देण्याचा हा एक ऐतिहासिक प्रयत्न ठरला.
१. पायाभूत सुविधा व सुरक्षितता
गडाच्या पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी सुरक्षित पायऱ्या किंवा सिमेंटचा मार्ग तयार करावा.
धोकादायक ठिकाणी लोखंडी रेलिंगची व्यवस्था करावी.
गड मार्गात व गडावर सौरदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून ग्राम सुरक्षा पथकाची स्थापना करावी.
२. पाणी व स्वच्छता व्यवस्था
गडावर पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था करावी.
गडावरील कचरा संकलन करून तो गडाखाली आणून योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी.
पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून गडावर बायोगॅसयुक्त स्वच्छता गृह उभारावे.
गड परिसर प्लॅस्टिकमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करून प्लॅस्टिकबंदी काटेकोरपणे अमलात आणावी.
३. ऐतिहासिक व सांस्कृतिक जतन
रामशेज किल्ल्याच्या शौर्यगाथेची माहिती शिल्प, माहितीफलक किंवा डिजीटल सादरीकरणाच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावी.
भग्नावस्थेतील बुरूज, कमानी, दरवाजे, देवळे व प्राचीन वस्तूंचे जतन व पुनर्स्थापन करावे.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराचे नूतनीकरण करावे.
४. पर्यावरण संवर्धन
गडावर वृक्षारोपण कार्यक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाला चालना द्यावी.
५. पर्यटक सुविधा
ठिकठिकाणी दिशादर्शक साईनबोर्ड व माहितीफलक लावावेत.
स्वागत केंद्र, स्वच्छतागृह व माहिती केंद्र उभारावे.
गडाला गिर्यारोहण पर्यटन व ट्रेकिंगसाठी चालना देऊन पर्यटन वृद्धी साधावी.
६. रोजगार व स्थानिक सहभाग
स्थानिक युवकांना प्रशिक्षित करून गाईड म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमात स्थानिक युवकांचा सहभाग वाढवावा.
संख्या नाही, बदल मोजतोय!